Friday, May 19, 2017

'राख'

माझ्या देहाचा हा भुगा
थोडा मातीत कालवा
त्याची घडवून वीट
पुंडलिकास पाठवा 

त्याच्या दारी अवेळीच
येते सावळीशी प्रभा
त्यास म्हणा करा देव
याच विटेवरी उभा

सांगा त्यास नाही झाली
याची जागेपणी भेट
आता तरी लागो माथी
धूळ चरणाची थेट

तोच आनंद सोहळा
राख झाला जरी देह
युगे अठ्ठावीस पुन्हा
नको जीव माया मोह...

-अतुल राणे. 

Friday, July 24, 2015

तिथे तू इथे मी

तिथे चारमाही ऋतू कोसळावा
इथे बारमाही रिते कोरडे
तिथे सप्तरंगी भुई सांडलेली
इथे तप्तरंगी नभाला तडे 
 
तिथे त्या फुलाला लळा मोरपंखी
इथे शुष्क काटे जणू पारधी  
तिथे लाजण्याला सदा ओठ ओले
इथे पापण्याही भिजे न कधी

तिथे ती भिजावी, नव्याने रुजावी
इथे भंगल्या वस्त्रदेहात मी
तिथे त्या कुशीला नवा जन्म माझा
इथे मी हरवलो अशी बातमी
-अतुल राणे

Monday, December 29, 2014

;;; झाली संध्याकाळ ;;;


झाली संध्याकाळ म्हणावी कि नभ दाटून आले ?
मरणोन्मुख या जगण्याला हे उगीच वाटून गेले. 

या जन्माला उमलायाचे, बहरायाचे होते,
नुकते कोठे आयुष्याला शोधायाचे होते,
आताशा तर स्वप्नांना आली पंखांची जोडी,
आता कोठे डोळ्यांना कळली जगण्याची गोडी. 
तिथे अनाहूत कशास हे यमराजच पाठून आले ? 
मरणोन्मुख या जगण्याला हे उगीच वाटून गेले. 

झाली संध्याकाळ नसावी तरी उगवला तारा,
अप्रूप वाटे अंतरातूनी वाहत नव्हता वारा, 
दिशेस त्या जाताना होता केवळ मंद प्रकाश,
अशी शांतता कधीच नव्हती, नवीन धुंद प्रवास,
नवजन्माची सफर असावी भासच चाटून गेले. 
मरणोत्तरहि जगण्याला हे उगीच वाटून गेले. 

- अतुल राणे.

Tuesday, December 2, 2014

तुझ्यावरची कविता

तुझ्यावरी सुचते न सुचते तोच कविता दुर्बळ होते
तुझ्या रूपाने हिच्या रुपाची जादू सरते खळबळ होते.

खळबळ होते मनातुनी अन केर वाढतो चुचकार्याचा
बरा बिचारा होता पूर्वी जनातुनी मग चुळबूळ होते.

चुळबूळ होते, दोष कुणाचा? कुठे पुरावा मागे उरतो?
सदैव भोळ्या साहित्याची तव हत्यारे कत्तल होते.

कत्तल होते मनात आणि जनात जाते जखमी कविता,
तुझ्या रुपाची चर्चा नाही कवितेसाठी हळहळ होते.

- अतुल राणे.

Monday, June 10, 2013

;;;;;;;;;;; पाऊस व्हायचंय … ? सोप्पंय …! ;;;;;;;;;;;पाऊस होणं तसं म्हणजे अगदी सोप्पं असतं,
आठ महिने बसून राहायचं, काही काम नसतं…!

पाण्याची वाफ काय सुर्यच असतो करत, 
इथून तिथे ढग नेत वारा बसेल फिरत,
आपण आपलं बॉससारखं सर्व काम पहायचं,
मस्तपैकी काळ्या सावल्या ढगात लपून राहायचं,
थंड हवा लागेपर्यंत बसून राहायचं नुसतं,
पाऊस होणं तसं म्हणजे अगदी सोप्पं असतं…!

गुरुत्वाची शक्ती मग बाकी काम करतेच,
आपण आपलं बरसायचं, नदी स्वतः भरतेच,
काही ठिकाणी रुसायचं, कुठे चक्क फसायचं,
आपण आपल्याच विजेवरती गडगड करत हसायचं,
ढगात बसून स्वतःलाच बघत राहायचं नुसतं,
पाऊस होणं तसं म्हणजे अगदी सोप्पं असतं…!

आपल्यामुळे काही मग कवी बिवी होतात,
चार सहा ओळी बरसून स्वतः पाऊस होतात,
कवितेला देतात मग उधारीचे थेंब,
पावसावरून सुरु होतात, लिहितात शेवटी प्रेम ,
वाटू लागतं आपण आता पावसापेक्षा श्रेष्ठ,
पण … 
पाऊस होणं खरं म्हणजे इतकं सोप्पं नसतं…!

आपल्याच राज्यामधून होतो हद्दपार राजा,
घ्यायची असते अज्ञाताच्या प्रवासाची सजा,
स्वतालाच करून घ्यायचा विरहाचा त्रास,
आठ महिने भोगायचा निव्वळ कारावास ,
आभाळभर वेड्यासारखं भरकटायचं नुसतं ,
पाऊस होणं खरं म्हणजे इतकं सोप्पं नसतं…!

बरसायला लागत असते मातीवरची ओढ,
अस्तित्वाची उधळण तिला वैराग्याची जोड,
थेंब थेंब करत सरळ झोकून द्यायचं असतं,
स्वतःलाच स्वतामधून फेकून द्यायचं असतं,
चार महिने आभाळभरून रडत राहायचं नुसतं,
पाऊस होणं खरंच सांगतो इतकं सोप्पं नसतं…!

- अतुल राणे. 

Sunday, May 19, 2013

;;;;;;; माझा वाढदिवस ;;;;;;;


अर्धा सरला, अर्धा बाकी, आयुष्याचा खेळ,
म्हटले थोड्या मारू गप्पा, मध्यान्तरची वेळ. 

कसा वाटला प्रवास इथवर पुसू नका कोणी ,
सुरूच झाला खेळ घेउनि डोळ्यातून पाणी . 

बालपणीचा काळ  बसुद्या तळाशीच तो गाळ,
आठवणी त्या जळास करतील गढूळ हो तात्काळ. 

यौवनातही नव्हते काही अप्रूप घडलेले, 
जे घडले ते रचणे नाही हे हि ठरलेले. 

मते मोजणी वाढविणारे हे पिकणारे केस,
डाय म्हणाली ' काय ? समजली कधी उलटली वेस ?'

असला 'माझा वाढदिवस' हा दरवर्षी येतो ,
क्षणाक्षणाला क्षणाक्षणांना दुरावून नेतो . 

कसे उडाले दिस, मास अन वर्षे एकोणतीस 
सांगा पाहू, मोजा बोटे, उरली एकूण??? तीस ! 

खरे पाहता उरलेल्यातून कमी कमी एकेक,
आभाळाशी हसतो आणि फुंकर खातो केक…!

;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;

Monday, August 20, 2012

;;;;;;;;;; औरच आहे .....! ;;;;;;;;;;


हीच शिकावी म्हणतो आता थोडी थोडी ,
तव नयनांची भाषा काही औरच आहे .....!

अमावसेची रात्रहि इतुकी गर्द नसावी,
पापण्यांवरी धार काजळी औरच आहे .....!  

इतका नव्हता कुणी कोरला इंद्रधनुही,
तव भुवयांची नाजूक नक्षी औरच आहे ....!

ब्रम्हांडीही नसेल कोठे तारा ऐसा
चंद्रकोर ती तुझ्या कपाळी औरच आहे ....!

इतके काही सोपे नव्हते तुझे भेटणे ,
बलवत्तर हे नशीब काही औरच आहे .....!

;;;;;;;;;;; अतुल राणे  ;;;;;;;;;;;

Tuesday, July 24, 2012

;;;;;;;;; का उगा देतोस खोट्या तारखांवर तारखा ? ;;;;;;;;;;;

तोड आता पाश सारे , बरस वेड्यासारखा ,
का उगा देतोस खोट्या तारखांवर तारखा ?

बरस ऐसा कि आता मज चिंब होऊन जाऊदे ,
अन तिचे पाण्यातले प्रतिबिंब होऊन जाऊदे ,
मज किती करशील आता त्या क्षणांना पारखा ?
का उगा देतोस खोट्या तारखांवर तारखा ?

सोड माझे बघ तिथे पाण्याविना कोणी मरे ,
बघ तयांच्या काळजालाही आता पडती चरे ,
विश्वास ज्यांनी टाकला पाठीत त्यांच्या वार का ?
का उगा देतोस खोट्या तारखांवर तारखा ?

;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;

Monday, June 18, 2012

;;;;;;;;;;;;; उधारी ;;;;;;;;;;;;;;
बैलास ना शिकविता परतून शिंग मारी ,
त्याने जणू शिकविली तुज बुडविण्या उधारी .

तव बोल ते फुकाचे देतो उद्याची देतो ,
तव न उद्या उजाडे, कळली तुझी हुशारी .

ना ऐकले जनांचे विश्वास टाकला मी ,
केलेस तोंड काळे, ना परतला माघारी .

मज पाहताच आता दुरुनी पळून जाशी,
पण रेकीशी कशाला ? ' भेटूच सोमवारी ' ...!

तुज शोधणे हि आता पुरते अशक्य झाले ,
वाटे तुलाही द्यावी पदवी आता ' फरारी' .


;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;Monday, June 11, 2012

;;;;;;;;;;; तुझ्या त्या क्षणांना ... ;;;;;;;;;;तुझ्या त्या क्षणांना पुन्हा पावसाने नभातून आणून सांडायचे ,
हि तू कि तुझ्या आठवांचा सडा हा, पुन्हा मी मनाशीच भांडायचे ,
कुठे या सरींपासुनी दूर नेऊन आजन्म देहास कोंडायचे ,
तिथेही तुझ्या आठवांच्या विजांनी निनादून थैमान मांडायचे .....!


;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;