Thursday, December 23, 2010

;;;;;;;;;;;;;;;;;; माचिस ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

कैसे मैं सर उसके मारू येह दोष ,
माचिस की डिबिया में रहेती जो रोज ,
नन्ही सी तीली लगाये न आग ,
वो थी जिसके हाथो में उसका येह दोष l
.
उजाला किया जिसने घर था वो मेरा ,
जला सबसे पहेले वो बिस्तर था मेरा ,
न सोचा था उसने जलाने  से पहेले ,
मेरी बच्ची थी ओढ़े सपने सुँनहेरे l
.
तखिये के निचे जो गीता थी पूरी ,
जली वो भी बिन मेरे आधी अधूरी ,
उसी का वचन कोई मरता न मारे ,
 हुवा फिर खड़ा मैं उसी के सहारे l


;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;

Friday, December 17, 2010

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; परीस ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

परीस शोधण्या निघे बापुडा , लोखंडाची माळ गळी ,
जो तो धोंडा घासत सुटला ,माळ होईना सोनसळी ,
दिवस बुडाले, मास लोटले, मानत नव्हता हार ,
अशात गेली वर्षे , झाला प्रौढपणी बेजार .


शेवटच्या श्वासात आठवे दुर्लक्षित ती माला ,
हाय पाहतो काय ,जाहली कधी सोन्याची माला ,
हाती येवून असा कोणत्या रुपात निसटून गेला ,
ना ओळखले परीसाला , अन जन्म फुकाचा झाला .


अशा कथेपरी आयुष्यातून परीस निसटून जाती ,
सुवर्णापरी सर्व सख्यांची करी कवड्यांतून गिनती ,
सांग लेकरा अशा कथेतून घेशील कसला बोध
आयुष्याचे सोने करतो असा परीस तू शोध .!


;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;

;;;;;;;;;;;;;;;;;;; हे नारी ;;;;;;;;;;;;;;;;;;

तुफान होऊन  दौडत ये तू ,
हो झाशीची राणी ,
डोंगर हि कापील चळचळा ,
सागर मागील पाणी .

...........तू खडगाची धार बनून  ये ,  
...........जगदंबा तलवार ,
...........जरी  मायेची उरात गंगा ,
...........पाठीवर संसार ..

नव्या युगाची नवी नार तू ,
जुनीच  ती वैदेही ,
तूच द्यावी का अग्निपरीक्षा ,
पतिव्रता  जर देही ...(?)

...........भ्रष्ट जाहली सर्व मर्कटे ,
...........लंका जाळील कोण ?
...........नायक हि सामील रावणा ,
...........तुजला तारील  कोण ?

कलियुगाची देत कारणे ,
घेती ना अवतार ,
असे देवपण काय कारणे
होती  तुज आधार ..?

...........स्मरण असू दे जिजाउचे त्या ,
...........जिने घडविला शिवा ,
...........कशास तुज मग भिक्षेमधला
...........तेहतीस टक्के हवा ..?

 ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

Thursday, November 25, 2010

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; २६ / ११ ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

खून से लथपथ थे लाशो के ढेर ,
अपनों को धुंडू किसी अपने  बगैर ,
जमीं मेरी सरकी  मेरे पैरो के निचे ,
तभी कोई हलके मेरे पैर खीचे ,
.
.................... हल्की  सी आहट थी हल्की सी तान ,
.................... नन्ही सी जां में ना थी इतनी जान ,
.................... पैरो पे अपने कभी चल ना पाती ,
.................... मासूम सी बच्ची को येही सजा थी l
.
हाथो में सर था लथपथ लहू से ,
जीती थी गोली किसी  जिंदगीसे ,
मेरा आंसू जाके लहू में गया मिल ,
कभी वो भी था मेरे अपनों में शामिल l 

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

Tuesday, October 26, 2010

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;गवळण ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

पाणवठ्यावर आली गवळण 
नाही किशन मुरारी , 
आज हरी ना छेडाया  मज
जाऊ  कशी माघारी ........!
.
........................कशास रुसला कान्हा मजवर
........................घडला काहि  गुन्हा ?
........................नको छळू रे  नंदकिशोरा ,
........................दर्शन दे रे पुन्हा ,
.
भरून घागर निघते बाई ,
काविल मजवर  माय  ,
श्रीमुख पाहेविना परंतु
निघू  न पाही  पाय......!
.
........................आज कसा ना कान्हा माझी
........................भरली घागर फोडी ,
........................कुणास ठावे असेल हि पण ,
........................श्रीरंगाची खोडी ....!
.
करुण अवस्था करून माझी ,
दडून गम्मत पाही ,
आज उमगले तुझ्याविना  
शृंगारा किंमत नाही ..............!

 ;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;

Monday, October 18, 2010

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; पाऊस ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

रिते आभाळ घागर 
करू  पाहतो पाऊस ,
ये ना भीज माझ्यासवे 
नको एकटी जाऊस.
.
............... सांजवेळ तुझी माझी 
............... भिजू देत पावसात  
............... आता तुझे माझे गीत 
............... पोचू देत आभाळात 
.
साऱ्या साऱ्या भिजवावे 
हीच पावसाची रीत 
क्षणभर तो हि थांबे
तुझे ऐकण्यास गीत 
.
............... देहभान विसरून 
............... दे गं पावसाला गाणे 
............... वेडा विसरून आला 
............... त्याचे ढगात रहाणे  
.
का गं बिचाऱ्या छळशी 
त्याला आवरेना रडू 
ओल्या ओल्या पावसाला 
नको सुका सुका धाडू 
.
............... सखे जाऊ नको अशी 
............... बघ आभाळ सुकेल 
............... ' तू ' हि नाही ' तो' हि नाही 
............... कशी कविता सुचेल ?

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

Monday, October 4, 2010

;;;;;;;;;;;;;;; पहाट ;;;;;;;;;;;;;;;

या केशरी उन्हातून
जागु नको अशी ,
स्मरूनी पुन्हा निशा ती 
लाजू नको  अशी !
.
....................हळुवार  पापण्यांच्या
....................मी पास पास जावे ,
....................अन ओंठ टेकताना
....................हासू  नको अशी !
.
अलवार या मिठीतून
देहास सोडताना ,
निद्रेस गोड माझ्या
मोडू  नको अशी !
.
....................केसांत का  तुझ्या मी
....................सहजीच गुंफलो , 
....................माझेच गूढ मजला
....................सांगू नको अशी !
.
देही तुझ्या बिलगल्या
रात्रीस पाकळ्या ,
झटकून त्या  फुलांना
रुसवू  नको अशी !
.

;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;

Tuesday, September 28, 2010

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; नास्तिक ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

देव म्हणजे काय ग ,व्याख्या तरी सांग ,
पाप काय पुण्य काय ,फरक तरी सांग ,
.
देवळात आलो नाही म्हणून उगीच आपली रुसतेस ,
पण रुसलीस कि आभाळातल  भिरभिर पाखरू दिसतेस ,
इतक मोठं  आभाळ तुला कुणी दिलं सांग !
पाप काय पुण्य काय ,फरक तरी सांग !
.
अशी कशी तू आज मला 'नास्तिक ' म्हणू शकलीस ?
नास्तिकाला देवच नसतो हे कुठे शिकलीस ?
अगं तुमचा देव माझ्यासाठी देवळाबाहेर येतो ,
तुझ्यावरच्या कवितेसाठी शब्द देवून जातो ,
तू तिथे रिकाम्या  गाभार्यात असतेस उभी ,
तुझी होते फसगत ,तुला कळतंच नाही कधी ,
गाभारयात त्याला परत धाडून मी फेडतो तुझे पांग ,
पाप काय पुण्य काय फरक तरी सांग !
.
देवळाबाहेर उभा असतो चपला तुझ्या दिसतात ,
माझ्यापेक्षा काट्यानपासून  त्याच तुला जपतात ,
तरी त्यांना तुझ्यासोबत देवळात थारा नाही ,
कधी कधी मग खरच वाटतं ,मलाही किंमत नाही !
इतकं झिजून का ग त्यांची देवळाबाहेर रांग ?
पाप काय पुण्य काय फरक तरी सांग ,
.
देव म्हणजे काय ग व्याख्या तरी सांग !
पाप काय पुण्य काय फरक तरी सांग !
.
;;;;;;;;;;;;;;;;अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;august 09

Thursday, September 16, 2010

;;;;;;;;;;;;;;;;; मी प्रौढ जाहलो ;;;;;;;;;;;;;;;;;;;

मी प्रौढ जाहलो अन,मज लागले कळाया,
तारुण्य काय आहे, फुलती कशा कळ्या या ,
ना रोखले कधी मी निर्लज्ज वासनांना ,
मी कोचले नखांनी कित्येकशा फुलांना !


मी कैक पाहिलेल्या सौन्दर्यवान नाऱ्या,
अन वाटले असेही व्हाव्यात सर्व भार्या ,
ती देहवासनाही आता जळून गेली ,
माझीच बाळ कन्या जेव्हा तरुण झाली !


;;;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;

;;;;;;;;;;;;;;;;; लढते मनात इच्छा ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

लढते मनात इच्छा माझ्याच काळजाशी,
परतून काय केव्हा येशील बाहुपाशी !
एकांत साठलेली हि रात्रही सरेना
निजाताच हाय टोचे त्या चांदण्या उशाशी !


..............अतुल राणे .............

;;;;;;;;;;; सावलीच झाड :::::::

त्या झाडाच्या सावलीत मज सुचेल सुंदर गाणे ,
विशाल झाडापरी देखणे रूप तयाचे व्हावे,
त्या गाण्याला फुटतील जेव्हा फांद्या विश्वरुपाच्या ,
त्याही देतील कुणा सावल्या नवीन निर्माणाच्या .

........................ज्या झाडाने दिली आजवर गाण्याला रसवंती
........................ज्या झाडाने तुच्छ वदवली हव्यासावर प्रीती
........................सावलीत त्या बसून तेथे गाईन गीत तयाचे ,
........................झुलतील अधरावरती माझ्या शामल सुंदर गीते .

नको नको ते जुनाट वेडे घरटे फक्त व्यथेचे
मुक्या कविता जाणून घेतील सावल्यातले देणे
स्वप्नीच्या त्या झाडाखाली देह ठेवतो आहे ,
या झाडाच्या सावलीत मी कविता रचतो आहे ,

::::::::::::::::::::अतुल राणे :::::::::::::::::::

;;;;;;;;;;;;;;;;तुजवर कविता;;;;;;;;;;;;;;;;;;;

शब्द शब्द जमुनी पानावर तुजवर कविता व्हावी
अर्ध्या ओल्या शब्दांमधुनी तू सामोरी यावी .


.............कितीक ओले शब्द तरंगे मनावरी हळवेसे
.............तुज कवितेला तूच टिपावे शब्द तुला साजेसे.


सहजगत्या उमटू दे ओळि कशास मग हा त्रागा ,
तूच रचावी तुजवर कविता मी तर केवळ धागा .


.............हि बघ झाली तुजवर कविता तुझ्या दिल्या शब्दांची
.............तुझे तळाचे नाव खोडूनी मीच मिरवितो माझी .


;;;;;;;;;;;;;;;;अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;

Friday, September 10, 2010

;;;;;;;;;;;;;;;मी प्रेमदिवाना ;;;;;;;;;;;;;;;;;;

मग भाषा कसली कुठून आली जात ,
प्रेमात आमुच्या तिचे नि माझे हात ,
त्या हातांवरच्या रेषा चाळीत बसतो ,
मी प्रेमदिवाना प्रेम वाजवीत फिरतो .

................डोळ्यात तिच्या त्या गंगेइतुकी खोली
................मज भेटाया अश्रूंची लावीत बोली
................त्या जलाशयावर जीव अर्पूनी देतो
................मी प्रेमदिवाना प्रेम वाजवीत फिरतो .

बेधुंद मनाचे स्वप्न ओंझळीत येते
ते पूर्ण कराया प्राण पणी लागते 
पण नयन  हळूच फाटक्या खिशाकडे वळतो
मग प्रेमदिवाना प्रेम वाजवीत फिरतो .

;;;;;;;;;;;;;;;;;;;  अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;