Sunday, May 19, 2013

;;;;;;; माझा वाढदिवस ;;;;;;;


अर्धा सरला, अर्धा बाकी, आयुष्याचा खेळ,
म्हटले थोड्या मारू गप्पा, मध्यान्तरची वेळ. 

कसा वाटला प्रवास इथवर पुसू नका कोणी ,
सुरूच झाला खेळ घेउनि डोळ्यातून पाणी . 

बालपणीचा काळ  बसुद्या तळाशीच तो गाळ,
आठवणी त्या जळास करतील गढूळ हो तात्काळ. 

यौवनातही नव्हते काही अप्रूप घडलेले, 
जे घडले ते रचणे नाही हे हि ठरलेले. 

मते मोजणी वाढविणारे हे पिकणारे केस,
डाय म्हणाली ' काय ? समजली कधी उलटली वेस ?'

असला 'माझा वाढदिवस' हा दरवर्षी येतो ,
क्षणाक्षणाला क्षणाक्षणांना दुरावून नेतो . 

कसे उडाले दिस, मास अन वर्षे एकोणतीस 
सांगा पाहू, मोजा बोटे, उरली एकूण??? तीस ! 

खरे पाहता उरलेल्यातून कमी कमी एकेक,
आभाळाशी हसतो आणि फुंकर खातो केक…!

;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;

No comments:

Post a Comment