Monday, June 10, 2013

;;;;;;;;;;; पाऊस व्हायचंय … ? सोप्पंय …! ;;;;;;;;;;;पाऊस होणं तसं म्हणजे अगदी सोप्पं असतं,
आठ महिने बसून राहायचं, काही काम नसतं…!

पाण्याची वाफ काय सुर्यच असतो करत, 
इथून तिथे ढग नेत वारा बसेल फिरत,
आपण आपलं बॉससारखं सर्व काम पहायचं,
मस्तपैकी काळ्या सावल्या ढगात लपून राहायचं,
थंड हवा लागेपर्यंत बसून राहायचं नुसतं,
पाऊस होणं तसं म्हणजे अगदी सोप्पं असतं…!

गुरुत्वाची शक्ती मग बाकी काम करतेच,
आपण आपलं बरसायचं, नदी स्वतः भरतेच,
काही ठिकाणी रुसायचं, कुठे चक्क फसायचं,
आपण आपल्याच विजेवरती गडगड करत हसायचं,
ढगात बसून स्वतःलाच बघत राहायचं नुसतं,
पाऊस होणं तसं म्हणजे अगदी सोप्पं असतं…!

आपल्यामुळे काही मग कवी बिवी होतात,
चार सहा ओळी बरसून स्वतः पाऊस होतात,
कवितेला देतात मग उधारीचे थेंब,
पावसावरून सुरु होतात, लिहितात शेवटी प्रेम ,
वाटू लागतं आपण आता पावसापेक्षा श्रेष्ठ,
पण … 
पाऊस होणं खरं म्हणजे इतकं सोप्पं नसतं…!

आपल्याच राज्यामधून होतो हद्दपार राजा,
घ्यायची असते अज्ञाताच्या प्रवासाची सजा,
स्वतालाच करून घ्यायचा विरहाचा त्रास,
आठ महिने भोगायचा निव्वळ कारावास ,
आभाळभर वेड्यासारखं भरकटायचं नुसतं ,
पाऊस होणं खरं म्हणजे इतकं सोप्पं नसतं…!

बरसायला लागत असते मातीवरची ओढ,
अस्तित्वाची उधळण तिला वैराग्याची जोड,
थेंब थेंब करत सरळ झोकून द्यायचं असतं,
स्वतःलाच स्वतामधून फेकून द्यायचं असतं,
चार महिने आभाळभरून रडत राहायचं नुसतं,
पाऊस होणं खरंच सांगतो इतकं सोप्पं नसतं…!

- अतुल राणे. 

No comments:

Post a Comment