Monday, December 29, 2014

;;; झाली संध्याकाळ ;;;


झाली संध्याकाळ म्हणावी कि नभ दाटून आले ?
मरणोन्मुख या जगण्याला हे उगीच वाटून गेले. 

या जन्माला उमलायाचे, बहरायाचे होते,
नुकते कोठे आयुष्याला शोधायाचे होते,
आताशा तर स्वप्नांना आली पंखांची जोडी,
आता कोठे डोळ्यांना कळली जगण्याची गोडी. 
तिथे अनाहूत कशास हे यमराजच पाठून आले ? 
मरणोन्मुख या जगण्याला हे उगीच वाटून गेले. 

झाली संध्याकाळ नसावी तरी उगवला तारा,
अप्रूप वाटे अंतरातूनी वाहत नव्हता वारा, 
दिशेस त्या जाताना होता केवळ मंद प्रकाश,
अशी शांतता कधीच नव्हती, नवीन धुंद प्रवास,
नवजन्माची सफर असावी भासच चाटून गेले. 
मरणोत्तरहि जगण्याला हे उगीच वाटून गेले. 

- अतुल राणे.

Tuesday, December 2, 2014

तुझ्यावरची कविता

तुझ्यावरी सुचते न सुचते तोच कविता दुर्बळ होते
तुझ्या रूपाने हिच्या रुपाची जादू सरते खळबळ होते.

खळबळ होते मनातुनी अन केर वाढतो चुचकार्याचा
बरा बिचारा होता पूर्वी जनातुनी मग चुळबूळ होते.

चुळबूळ होते, दोष कुणाचा? कुठे पुरावा मागे उरतो?
सदैव भोळ्या साहित्याची तव हत्यारे कत्तल होते.

कत्तल होते मनात आणि जनात जाते जखमी कविता,
तुझ्या रुपाची चर्चा नाही कवितेसाठी हळहळ होते.

- अतुल राणे.