Friday, July 24, 2015

तिथे तू इथे मी

तिथे चारमाही ऋतू कोसळावा
इथे बारमाही रिते कोरडे
तिथे सप्तरंगी भुई सांडलेली
इथे तप्तरंगी नभाला तडे 
 
तिथे त्या फुलाला लळा मोरपंखी
इथे शुष्क काटे जणू पारधी  
तिथे लाजण्याला सदा ओठ ओले
इथे पापण्याही भिजे न कधी

तिथे ती भिजावी, नव्याने रुजावी
इथे भंगल्या वस्त्रदेहात मी
तिथे त्या कुशीला नवा जन्म माझा
इथे मी हरवलो अशी बातमी
-अतुल राणे